देशात पुरुषांपेक्षा महिलांना १६.१ टक्के कमी पगार : सर्वेक्षण

भारतात आजही स्त्री-पुरुष समानता असली तरी वेतनाच्या बाबतीत मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन दिले जाते. असे चित्र नुकतेच एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. भारतामध्ये महिलांना पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के कमी वेतन दिले जाते. भारतासह जगभरातीळ विविध देशांत नोकरीच्या ठिकाणी असा लिंगभेद अद्यापही सुरू आहे. ही आश्चर्यकारक माहिती ‘कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्स’च्या अहवालात सविस्तर मांडली आहे.

जागतिक स्तरावाराही महिलांची ही स्थिती कायम आहे. जागतिक स्तरावरही पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन महिलांना कमी दिले जाते. एकाच कंपनीमध्ये समकक्ष काम करणाऱ्या पुरुष आणि महिलेच्या वेतनातील फरक दीड टक्क्यांनी कमी आहे. समान काम करणाऱ्यांमध्ये हे अंतर केवळ ०.५ टक्क्यांनी कमी होत आहे. भारतामध्ये एकाच पातळीवर काम करणाऱ्या महिला व पुरुषाच्या वेतनामधील हेच अंतर चार टक्के आहे. तर एकसारखेच काम, जबाबदारी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये हेच अंतर ०.४ टक्क्यांनी कमी आहे.

हा लिंगभेद भारतात शेजारच्या चीन पेक्षाही जास्त आहे. चीनचा १२.१ टक्के आहे. तर ब्राझीलसारख्या देशांध्ये हाच आकडा २६.२ म्हणजेच सर्वाधिक आहे. फ्रान्समध्ये १४.१, जर्मनी १६.८, यूकेमध्ये २३.८ आणि अमेरिकेमध्ये १७.६ आहे.

हे सर्वेक्षणासाठी ‘कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्स’ने ५३ देशांतील १४ हजार कंपन्यांचा अभ्यास केला. यामध्ये जवळपास १२.३ दशलक्ष कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा समावेश आहे. या पैकी काही कंपन्यांमध्ये महिलांना सरासरीपेक्षाही कमी वेतन दिले जाते. एकाच पदावरील कर्मचाऱ्यांचा अभ्यास केल्यास हा आकडा कमी होत असल्याचे कॉर्न फेरीचे मुख्य अधिकारी बॉब वेस्सलकॅम्पर यांनी सांगितले.