विदर्भातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 16 कोटींचा निधी

पोलिसनामा ऑनलाईन – पूरपरिस्थितीमुळे विदर्भातील बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. निधीतून पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना साहाय्य व जखमींना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णत: वाहून गेली असल्यास किंवा त्याचे नुकसान झालेले असल्यास त्यासाठी सुमारे 8 कोटी 86 लाख 25 हजार रुपये दिले जाणार आहे. अंशत: पडझड झालेली कच्ची व पक्की घरे तसेच नष्ट झालेल्या झोपडया यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी 7 कोटी 15 लाख रुपये, मदत छावण्या चालवण्यासाठी 47 लाख रुपये असा एकूण 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे. त्यामुळे आता विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.