महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस ; भूसुरुंग IED स्फोटात क्यूआरटीचे १६ जवान शहीद

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस घातला आहे. नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या क्यूआरटी पथकला भूसूरुंगात IED स्फोट करून उडवून लावल्याची घटना घडली आहे. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ घडली आहे. दरम्यान, या घटनेत १६ हून अधिक क्यूआरटीचे जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नक्षल्यांच्या भूसूरुंगाच्या स्फोटाला सरकारने दुजोरा दिला आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंबींग ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र दिनीच घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सीआरपीएफच्या क्वीक रिस्पॉनस् टीममधील जवान खासगी वाहनाने जात असताना ही घटना घडली. नक्षलींना चकवण्यासाठी जवानांनी खासगी वाहनाचा आधार घेतला होता. मात्र नक्षलींना याविषयी कुणकुण लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अशरश: चिंधड्या उडाल्या आहेत.

हा भ्याड हल्ला कितीही निषेध केला तरी कमीच आहे. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये शांततेत सहभाग नोंदवला. भीती केल्यानंतरही लोक मतदार केंद्रांपर्यंत पोहोचले याचा राग नक्षलवाद्यांच्या मनात होता. त्यातूनच हा हल्ला घडवला असे दिसतंय, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकार कठोर पावले उचलेल असेही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.