Coronavirus : चालकाच्या पत्नीला ‘कोरोना’ ! तहसीलदार, BDO आणि 4 डॉक्टरांसह 16 कर्मचारी ‘क्वॉरंटाईन’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना फैलाव अधिक प्रमाणात झाला आहे. विदर्भात अमरावतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची  संख्या 53 वर पोहचली असून आतापर्यंत 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे वरुड येथील तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण शासकीय यंत्रणेने धसका घेतला आहे. वरुडचे तहसीलदार, BDO, आरोग्य अधिकारी, 4 डॉक्टरांसह 16 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ड्रायव्हरच्या पत्नीला कोरोना झाल्याचे समजताच तहसील कार्यालयाचे सॅनिटायजेशन करण्यात आले आहे. वरूड तालुक्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून वाहन चालक रहात असलेल्या आपसपासचा परिसर पूर्णत: कंटेनमेट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. वरूड तालुक्याची यंत्रणाच क्वारंटाईन झाल्यान प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या सर्वांनी घरूनच काम करायला सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तालुका ठिकाण असलेल्या वरूड येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वरूड परिसर बंद करण्यात आला आहे. या महिलेने खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यामुळे या रुग्णालयाला देखील सील करण्यात आले आहे. एवढंच नाही तर डॉक्टरांसह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अनेकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

वरूडमध्ये कसा आला कोरोना
तहसीलदार यांच्या शासकीय वाहनावर वाहनचालकाच्या वडिलांचे 15 एप्रिल रोजी चांदूर रेल्वे येथे निधन झाले होते. त्यावेळी वाहनचालक पत्नीसह चांदूर रेल्वे येथे गेले होते. अंत्यविधीला यवतमाळ येथूनही काहीजण आले असल्याची माहिती आहे. यातून वाहनचालकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चालकाच्या कुटुंबातील 4-5 जणांना  चांदूर रेल्वे येथील4 जणांना अमरावती आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. सर्वांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चांदूर रेल्वे शहराच्या सर्व सीमा सील करण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.