कर्वेनगरमध्ये १६ वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांच्या टोळक्याने मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर टिकाव, कुदळीने घाव घालून त्यांची तोडफोड केली. या तोडफोडीत ४ दुचाकी आणि १२ मोटारींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हिंगणे होम कॉलनीतील मिलेनियम शाळे जवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला नागरिकांची वाहने पार्क केली होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरुन तिघे जण आले. त्यांनी हातातील टिकाव व कुदळीने रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांवर घाव घालण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रामुख्याने चारचाकी वाहने लक्ष्य केली. अनेक वाहनांच्या काचा त्यांनी फोडल्या. एका महिला व पुरुषांनी हा प्रकार पाहिला़ पण घाबरुन ते बाहेर येऊ शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मार्शल हे घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.

या घटनेत पार्क केलेल्या १२ वाहनांची हल्लेखोरांनी तोडफोड केली असून ४ दुचाकी गाड्याही फोडण्यात आल्या आहेत. गाड्यांच्या काचा फोडल्यानंतर त्यांनी टिकाव, कुदळ तेथेच टाकून देऊन पळ काढला. स्थानिक तरुणांनी हा प्रकार केल्याची माहिती पुढे आली असून त्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. वारजे पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.