अधिकारी होण्याच्या ‘साई’च्या उमेदीला सृष्टीने हिरावले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या त्या उमद्या उमलत्या तरूणाच्या स्वप्नांना चितेने वेढले. एकीकडे दहावीची परीक्षा सुरू असताना दुसरीकडे मात्र, तो नियतीच्या परीक्षेत नापास होऊन अनंताच्या प्रवासाला निघून चालला होता. त्याच्याबरोबर खेळणारे व बागडणारे त्याचे मित्र परीक्षेचा पेपर लिहीत असताना पेनातील शाईबरोबरच डोळ्यातील आश्रू पेपरवर ढाळत होते. त्याच्या आठवणींनी व्याकुळ होऊन त्यांनी कशीबशी शिक्षणाची परीक्षा दिली खरी, मात्र, त्या तरूणाबरोबरच त्याचे मित्रही ‘साई’च्या विरहाने दैवाच्या परीक्षेत हतबल झाले होते.
अशी हृदयद्रावक व काळीज पिळवटून काढणारी, अशी घटना राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील शिंदे परिवारात घडली. शिंदे परिवारातील नुकताच तारूण्याच्या उंबरठ्यावर उभा राहिलेल्या साईचे आयुष्य उमलण्याआधीच त्याचे आजारपणामुळे दुर्दैवी निधन झाल्याने शिंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाच पण पंचक्रोशीतील नागरिकांना सुद्धा दुःखाच्या परिसीमा ओलांडता आल्या नाहीत. ऐन दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी व परीक्षेच्या वेळी इकडे पेपर सुरू असताना तिकडे सोनगावच्या स्मशानभूमीत साईला अखेरचा निरोप दिला जात होता.

‘ही माझी शिकार’ म्हणत पाकिस्तानी विमानाचे ८६ सेकंदात उडविले चिथडे 

सोनगांव येथील कोंडाजी तात्याबा शिंदे यांचे दोन महिन्यापूर्वीच दुख:द निधन झाले. या धक्क्यातून शिंदे कुटुंबीय सावरत असतानाच शिंदे कुटुंबियातीलच अभियंता सूर्यभान शिंदे यांच्या दहावीत शिकणार्‍या 16 वर्षीय साई या मुलाला नियतीनेही शिंदे कुटुंबीयापासून हिरावून घेतले. काल शुक्रवारी सकाळी 11 वाजता दहावीच्या बोर्डाचा पहिला पेपर होता. मित्रांसमवेत साईने परीक्षेची पूर्वतयारी केली होती. पण त्यापूर्वीच साईच्या शरीराला साधारण ताप येण्याचे सत्र सुरू झाले. त्यामुळे प्रारंभी साईचे वडील सूर्यभान यांनी साईला श्रीरामपूर येथील खासगी रूग्णलयामध्ये दाखल केले. मात्र, उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने साईला नगर येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले.

या कालावधीत साधारण असणार्‍या तापात वाढ होऊन पोटदुखीचीही समस्या निर्माण झाली. त्यामुळे साई उपचारादरम्यान अत्यवस्थ होत गेल्याने त्याला पुढील तातडीच्या उपचारासाठी पुणे येथील के.ई.एम.रूग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी साईला बारकाईने तपासून त्याच्या शरीरातील किडनीला बुरशीजन्य आजार झाल्याचे निदान केले. यामुळे काही काळ शिंदे कुटुंबीय हादरून गेले. परंतु तरीही त्यांनी यातून सावरत के.ई.एमच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली साईवर उपचार करण्यास प्रारंभ केला. प्रारंभी साईची उपचारादरम्यान एक किडनी निकामी झाल्यामुळे तिच्यावर सर्जरी करत ती खराब झालेली किडनी शरीरातून काढण्यात आली. यानंतर काहीकाळ साईची प्रकृती सुधारली. यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी साईला लवकरच डिस्चार्ज मिळेल, असा दिलासा दिला. दरम्यान, शरीरातून शस्त्रक्रिया करून बाहेर काढलेल्या  किडनीचा दुसर्‍या किडनीला संसर्ग होऊन दुसर्‍या किडनीवर त्याचा अतिरिक्त ताण पडल्यामुळे साईची प्रकृती अचानक खालावण्यास सुरूवात झाली. याची कल्पना वैद्यकीय अधिकार्‍यांनी शिंदे परिवाराला देताच त्यांनी साईला कोईमतूर, चेन्नई येथील अद्यावत रूग्णालयामध्ये हलविण्याचा निर्णय घेतला.

याचवेळी एकीकडे साईच्या बोर्डाच्या परीक्षेचा पहिला पेपर सुरू होऊन आयुष्याचे एक नवे दालन उघडणार होते. तो पुढे एक उच्च अधिकारी होण्याच्या विचाराधीन होता. पण याचवेळी नेमके नियतीने आपला डाव साधत साईचे आयुष्य हिरावून घेत ऐन परीक्षेच्या दिवशी पुणे येथे उपचारादरम्यान अखेरचा निरोप घेतला.