शिक्रापूरमध्ये 16 वर्षीय युवतीचा विनयभंग, 32 वर्षाच्या तरूणावर FIR दाखल

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथून पुणे येथे जाण्यासाठी आपल्या मोठ्या बहिणीसोबत थांबलेल्या सोळा वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल राजाराम पवार या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर ता. शिरुर येथील पाटवस्ती रस्त्या लागत सोळा वर्षीय युवती तिच्या मोठ्या बहिणीसोबत पुणे येथे जाण्यासाठी थांबलेली असताना राहुल पवार हा युवक त्या ठिकाणी आला त्याने सदर अल्पवयीन युवतीशी अश्लील हावभाव करत युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून युवतीचा पाठलाग करून युवतीशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत पिडीत सोळा वर्षीय युवतीच्या मोठ्या बहिणीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी राहुल राजाराम पवार वय ३२ वर्षे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हे दाखल करत राहुल पवार यास अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.