पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास ‘गणपती बाप्पा’ पावला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण यांच्यातील पोलीस ठाणे कमी करुन तयार करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. त्यातच उद्या पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. यामुळे हा उत्सव कमी मनुष्यबळात पार पाडणे मोठे आवाहन होते. अश्यातच आज पुणे पोलीस आयुक्तालयातून सहायक फौजदार ते पोलीस शिपाई अशा एकूण १६६९ जणांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज बुधवारी वर्ग करण्यात आले आहे. तर यापूर्वी एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक आणि ६७ पोलीस उपनिरीक्षक देण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण पोलिसांकडून पोलीस अधिकारी, कर्मचारी देण्यात आले आहेत.

जाहिरात

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची विभाजनी झाल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून १८५५ आणि पुणे ग्रामीणकडून ३५२ जणांचे मनुष्यबळ देण्याचे ठरले होते. त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी दोन्ही कडून काही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र पुणे शहर पोलिसांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना अधांतरी ठेवण्यात आले होते. आज पुणे शहर पोलीस यांच्याकडून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी १६६९ जणांची बदली केली आहे. झोन तीनमधील पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि इतर पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये सहायक फौजदार १४३, पोलीस हवालदार ३७५, पोलीस नाईक ४२०, पोलीस शिपाई ७३१ असे एकूण १६६९ पोलिस कर्मचारी दिले आहेत. तर पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ तीन (पिंपरी-चिंचवड) मधील पोलीस ठाण्यातील ५७ पोलीस हवलदार ते पोलीस शिपाई यांना पोलीस आयुक्तालयात घेण्यात आले आहे.

सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, रवींद्र चौधर, मोहनराव शिंदे, प्रसाद गोकुळे, शिवाजी गवारे, सतीश माने, सुनील पिंजण, विठ्ठल कुबडे, रंगनाथ उंडे, रवींद्र जाधव, प्रभाकर महिपती शिंदे, विश्वजीत खुळे, नरेंद्र जाधव, अजय भोसले, भिमराव शिंगाडे, खंडेराव खेरे, राजेंद्र काळे, शंकर अवताडे, नवनाथ घोगरे, नितीन विजय जाधव, अरुण ओंबसे, संजीव पाटील, किशोर म्हसवडे, रवींद्र निंबाळकर, ब्रम्हांनन्द नाईकवडी, अरविंद जोंधळे या सर्व अधिकाऱ्यांना यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहे.

ते अधिकारी पिंपरी-चिंचवड मध्येच
पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ तीन (पिंपरी-चिंचवड) मधील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे २४ सहायक पोलिस निरीक्षक आणि ८ उपनिरीक्षक यांच्या बदल्या पुणे पोलीस आयुक्तालयात दाखवल्या आहेत. मात्र या अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून कार्यमुक्त केले नाही. या अधिकाऱ्यांना आहे तिथेच ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ते अधिकारी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात राहिले आहेत.