Coronavirus : पावसाळी अधिवेशनापूर्वी 24 खासदार ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील २४ खासदारांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. यात भाजप खासदार मीनाक्षी लेखी, प्रवेश साहिब सिंग वर्मा, कर्नाटकचे भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांचा समावेश आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या खासदारांची कोरोना टेस्ट झाली होती.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. कोरोना संसर्गामुळे संसदेत अत्यंत काळजीपूर्वक खबरदारी घेतली जात आहे. ज्या खासदारांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे तेच संसदेच्या कामकाजात सहभागी होत आहेत. यासंदर्भात दिल्लीत सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी येणाऱ्या सर्व खासदारांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.

यावेळी भाजप खासदार मीनाक्षी लेखी, प्रवेश साहिब सिंग वर्मा आणि अनंत कुमार हेगडे यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे हे खासदार सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत.

हे खासदार आहेत कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खासदारांमध्ये मीनाक्षी लेखी, प्रवेश साहिब सिंग वर्मा, अनंत कुमार हेगडे, सुखबीर सिंह, डॉ. सुकांता मजूमदार, जी माधवी, प्रताप राव जाधव, जनार्दन सिंह सिग्रीवाल, हनुमान बेनीवाल, विद्युत वरन महतो, प्रदान बरुआ, एन रेडप्पा, सेल्वम जी, प्रताप राव पाटील, रामशंकर कठेरिया, सतपाल सिंह, रोडमल नागर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर खासदार हनुमान बेनीवाल म्हणाले की, त्यांचा अहवाल कुठे निगेटिव्ह येत आहे, तर कुठे पॉझिटिव्ह येत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी कोणता अहवाल योग्य मानला पाहिजे.

इकडे राज्यसभेच्या कामकाजापूर्वी खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा, अहमद अशफाक करीम, अशोक गस्ती, नारायण भाई जी राठवा, शांता क्षत्रिय आणि अभय भारद्वाज गुजर यांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

आणखी एक खासदार कोरोना पॉझिटिव्ह
ताज्या माहितीनुसार, भाजपच्या आणखी एका खासदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यांनी ट्विट करून त्याबद्दल माहिती दिली आहे.