पुणे : नुकत्याच वयात आलेल्या पोरानं ‘रजिस्ट्रेशन’ केलं ‘डेटींग’ साईटवर, अन् गमावले तब्बल ‘एवढे’ लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उच्चभ्रु कुटूंबियातील एकुलत्या एक 17 वर्षीय मुलाने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केले अन 2 लाख घालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याला धमकावत एका तरूणीने त्याच्याकडून पैसे उकळले आहेत. सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी मुलाच्या 43 वर्षीय आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बिबी नावाच्या तरूणीवर फसवणूक, आयटी अ‍ॅक्टसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगा उच्चभ्रु कुटूंबियातील आहे. कुटूंब येथील माणिकबाग परिसरात राहते. तो एका नामांकित महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेतो. त्याचे आई-वडिल खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना एकच मुलगा आहे.

दरम्यान, त्याने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली होती. याबाबत त्याच्या पालकांना काहीच माहिती नव्हते. नाव नोंदणी केल्यानंतर बिबी नावाच्या एका तरुणीने मुलाला संपर्क साधला. तो लहान असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला भिती दाखविण्यास सुरूवात केली. तुझ्या घरी पोलीस येतील तुला पकडून नेण्यास सांगते, असे सांगत त्याला खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले. त्याच्याकडून वेळोवेळी एकूण 1 लाख 94 हजार रुपये घेतले. तो ऑनलाईन माध्यमातून या तरुणीच्या खात्यावर पैसे भरत असत.

त्यासाठी त्याने आईचे डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर केला. परंतु, याचा पत्ता त्यांना लागला नाही. तो पैसे पाठविल्यानंतर आईच्या मोबाईलवर बँक खात्यातून येणारे एसएमएस डिलीट करत असे. मात्र, गेल्या महिन्यात त्याने पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आलेला एसएमस आईने पाहिले. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. यावेळी त्यांना खात्यातून तब्बल 1 लाख 94 हजार रुपये कमी ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी घरी येऊन पतीला यााबाबत विचारले. त्यावेळी त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

यानंतर पिडीत मुलाला विचारले. यावेळी तो रडू लागला. त्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली होती. त्यानंतर बिबी नावाच्या तरुणीने मला भिती दाखवून पैसे पाठविण्यास सांगत असल्याचे आईला सांगितले. यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पालकांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हा सर्व प्रकार फेब्रुवारी ते ऑक्टोंबर 2019 मध्ये घडलेला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेळके हे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/