गोवर-रुबेला लसीकरणात १७० बालकांवर रिॲक्शन

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – गोवर रुबेला लसीकरण मोहिमेदरम्यान जिल्ह्यात ८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असले तरी १७० बालकांवर रिॲक्शन झाल्याने त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यात आराध्या वाघाये (११ महिने) हिचा मृत्यू झाला. १० बालके शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचार घेत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सालेभाटा किंवा आरोग्य उपकेंद्र लाखोरी येथे भेट न देताच खाजगी डॉक्टरांकडे उपचार केले. भोंदूबाबाचेही उपचार घेतल्याचे सांगत होते, पण पुण्य नगरी चमूने आराध्या वाघाये हिच्या घरी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली असता गोवर रुबेलाच्या लसीनंतर प्रकृती बिघडली. औषधोपचारासाठी नेण्याचा खर्चही कुटुंबीयांनाच करावा लागला असताना आरोग्य विभागाची धुरा सांभाळणारे अधिकारी वस्तुस्थिती न सांगता थापा मारत होते.

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेदरम्यान १७० बालकांवर रिॲक्शन झाली, त्यात एकीचा मृत्यू आणि १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असल्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी जि.प.पदाधिकाऱ्यांना माहिती उपलब्ध केली नाही, ही गंभीर बाब आहे.

जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालक बालिकांना गोवर-रुबेलाची लस देण्याची मोहीम २७ नोव्हेंबरपासून सुरू आहे. या लसीकरणासाठी ३ लाख ६ हजार लस जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. १४२८ शाळा आणि १४२७ अंगणवाडी केंद्रातील २ लाख ६४ हजार ८४२ लाभाथ्र्यांना लसीकरण करावयाचे आहे. १५ डिसेंबरपर्यंत २ लाख २१ हजार ३३४ लाभाथ्र्यांना लसीकरण करण्यात आले असून ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले असून २७ डिसेंबर २०१८ पर्यंत उद्दिष्ट करण्यात येणार आहे.

लसीकरणादरम्यान १७० बालकांना सौम्य स्वरूपाच्या प्रतिक्रिया उद्भवल्या असून वेळीच औषधोपचार केला गेला असला तरी यश जगनाडे ११ महिने मालीपार (भंडारा) इशांत गजघाटे ४ वर्षे मासळ (लाखांदूर), नाजनीन कलाम खान पठाण (११) सोनेगाव, आस्था रोडगे (१) गर्रा, संग्राम गोंडगे (४) गर्रा, दीप गोपाले (३) आसलपाणी, स्वस्तिक मोथनकर (९) महिने पिटेसूर (तुमसर) हे १० रुग्ण मध्यम प्रतिक्रिया झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचार घेत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते उपस्थित होते. आरोग्य विभागातील बडे अधिकारी आराध्या रंजीत वाघाये या अकरा महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूपासून अनभिज्ञ होते.