हद्दपारीचे १७६ प्रस्ताव : आ. कर्डिले, आ. जगताप, राठोडांचाही समावेश

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन – महानगरपालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी काही व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व तडीपार करण्याची कारवाई करण्यात येत आहे. नगर उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे ४८१ हद्दपारीच्या प्रस्तावावर सुनावणी अंतिम टप्प्यात आहेत. त्यातच निवडणुकीस बाधा पोहोचवतील अशा संशयित व्यक्तींना हद्दपार करण्याबाबत भिंगार कॅम्प व कोतवाली पोलिस ठाण्यांकडून १७६ प्रस्ताव नगर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे दाखल झाले आहेत. यामध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड यांचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. तडीपार करण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव दाखल होताच त्यांना नोटीस बजावण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. नगर शहराच्या हद्दीतील कोतवाली, तोफखाना, भिंगार, एमआयडीसी अशा पोलिस स्टेशनकडून प्रांताधिकारी कार्यालयात एकूण ४८१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या सर्वांना नोटीस पाठवून त्यांची सुनावणी नगरच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यासमोर सुरू आहे. मात्र, तडीपारीबाबत पोलिस स्टेशनकडून येणाऱ्या प्रस्तावांची संख्या जास्त असल्याने नव्याने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर नगरच्या तहसीलदारांसमोर सुनावणी घेण्याचे आदेश सोमवारी सायंकाळी देण्यात आले होते.

त्यानुसार तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनकडून १३८ व कोतवाली पोलिस स्टेशनकडून ३८ असे एकूण १७६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यासर्व प्रस्तावांचा अभ्यास करून त्यानुसार संबंधितांना तुम्हाला निवडणूक काळात नगर शहरातून हद्दपार का करू नये? आसा जाब विचारणारी नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर हद्दपारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

१० वी च्या विद्यार्थ्यांच्या कलमापन चाचणीबाबत शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय