दुर्देवी ! आसामच्या जंगलात वीज पडून 18 हत्तींचा मृत्यू

गुवाहाटी : वृत्तसंस्था – आसाममध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना नगाव जिल्ह्यातील जगंलात घडली. वन विभागाचे विरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितले की, काठियाटोली रेंजच्या कुंडोली वन क्षेत्रात एका पहाडावर वीज कोसळली. यामध्ये 18 हत्तींचा मृत्यू झाला आहे.

दोन वेगवेगळ्या भागांत अनेक हत्ती मृतावस्थेत सापडलेत. यातील एका जागेवर चार तर दुसऱ्या जागेवर 14 हत्ती मृतावस्थेत आढळले. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी हत्तींचा मृत्यू होण्याची ही भारतातील पहिलीच घटना असावी. या दुर्घटनेची दखल आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी घेतली. त्यांनी वनाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. मृत हत्तींच्या शवविच्छेदन अहवालात हत्तींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.

अमित सहाय यांनी सांगितले की, या भागात आमची टीम गुरुवारी दुपारी पोहचू शकली. दोन झुंडींमध्ये हत्तींचे मृतदेह आढळून आले. यामध्ये 14 हत्तींचे मृतदेह डोंगरावर आढळले तर चार मृतदेह डोंगराच्या खालच्या भागात सापडले. सहाय यांनी सांगितले की, बुधवारी रात्री वीज कोसळून हत्तींचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पोस्टमार्टम केल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजणार आहे.

आसामचे वनमंत्री परिमल सुक्लाबैद्या यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आकाशातील वीज कोसळून 18 हत्तींचा मृत्यू झाल्याचे समजले. हत्तींच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमार्टम नंतर समजणार आहे. मी घटनास्थळाचा दौरा करणार आहे.