UPSC च्या IAS परिक्षेत JNU च्या विद्यार्थ्यांचा ‘बोलबाला’, पटकावल्या 32 पैकी ‘एवढ्या’ जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत भारतीय अर्थशास्त्र सेवे (आयईएस) ची परीक्षा घेण्यात येत असते. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला असून ३२ जागांपैकी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या तब्बल १८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संप्पन्न केले आहे. सध्या जेएनयू मधील वातावरण चांगलेच तापले असून हिंसाचार आणि आंदोलनामुळे जेएनयू सध्या खूप चर्चेत आहे. विशेष म्हणजे भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा बोलबाला नेहमीच पाहायला मिळत असतो.

यूपीएससी कडून घेण्याऱ्या या परीक्षेत देशभरातून केवळ ३२ जागा होत्या. या ३२ जागांपैकी देखील एकट्या जेएनयू मधील विद्यार्थ्यांनी तब्बल १८ जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे इतर विद्यापीठांपेक्षा जेएनयू विद्यापीठाच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. दरम्यान जेएनयू नेहमीच चर्चेत असते. ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार झाला आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली होती. यावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले असून जेएनयू मधील वातावरण चिघळलेल्या अवस्थेत आहे.

दरम्यान या हिंसाचाराच्या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी, विचारवंतांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यापैकी भाजपा आणि अभाविपनं जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप केला होता. तर डावी विचारसरणीवाल्यांनी जेएनयूला सर्वोत्तम विद्यापीठ गौरवणारं सरकार दुटप्पीपणानं वागत असून विद्यापीठाला उद्ध्वस्त करण्याचा हा कट त्यांच्याकडून सुरू आहे असा आरोप केला होता. अशा या डाव्या उजव्या संघर्षात मात्र जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून यश प्राप्त केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/