Satara News : दुर्दैवी ! ‘बर्थडे’च्या दिवशी युवतीचा अपघाती मृत्यू

विडणी: महाड-पंढरपूर महामार्गावर विडणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत फलटणची दुचाकीस्वार युवती ठार झाली. हि घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून जान्हवी संजय काकडे (वय १८, रा. मंगळवार पेठ, फलटण), असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.

दरम्यान, जान्हवीचा शुक्रवारी वाढदिवस होता. तिच्या मैत्रीणीचाही वाढदिवस असल्याने तो आनंद साजरा करण्यासाठी जात असताना काळाचा घाला झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जान्हवी ही शुक्रवारी सायंकाळी महाड-पंढरपूर महामार्गावरुन विडणी येथील कोकरेवाडी येथे आपल्या मैत्रीणीकडे निघाली होती. जान्हवी व तिच्या कोकरेवाडी येथील मैत्रिणीचाही शुक्रवारीच वाढदिवस होता. त्यामुळे ती मैत्रीणीकडे दुचाकीवरून (क्र. एम एच -११बीपी-७२९७) केक घेऊन निघाली होती. दरम्यान, तिच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोराची धडक बसली. अपघातात गंभीर दुखापत झाली होती. परिसरातील नागरिकांनी अपघातानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती  तीच्या कुटुंबियांना व मैत्रीणींना समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद उशिरा झाली.