Corona Vaccination : खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली ‘ही’ मोठी मागणी

नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्रीय अहवालानुसार 12 एप्रिलनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा धोका आहे. 18 वर्षांच्या पुढील तरुणांना कोरोना लसीकरण करण्याची गरज असून याबाबतची मागणी आपण केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

कोरोना संसर्ग व उपाययोजना याबाबतचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी नारायणगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार कोल्हे म्हणाले, कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. पुण्यात रुग्णांसाठी बेड शिल्लक नाही. अर्थचक्र ठप्प होऊ नये म्हणून लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रशासनाने धार्मिक विधी, विवाह सोहळा, दशक्रिया, अंत्यसंस्कार आदी साठी संख्येचे निर्बंध लादले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखणे, मृत्यू दर कमी करणे, कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवणे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. जुन्नर तालुक्यात लसीकरणाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. लेण्याद्री येथील कोरोना उपचार केंद्रात 334 रुग्ण दाखल झाले असून येथे बेड शिल्लक नाही. ओझर येथील कोरोना उपचार केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लेण्याद्री व ओझर येथील कोरोना उपचार केंद्रात 620 बेडची व्यवस्था केली जाणार असल्याचे ते म्हणाले.