Run मशीन कॅप्टन विराट कोहलीचा ‘परफॉर्म्स’ – ’19 डाव, 0 शतके’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंड दौर्‍यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म चालूच आहे. न्यूझीलंडबरोबर खेळल्या जाणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी कर्णधार कोहली काही खास कामगिरी करू शकला नाही आणि त्याने केवळ दोन धावा केल्या. विश्वासार्ह फलंदाज चेतेश्वर पुजारा (११) बाद झाल्यानंतर, मैदानात उतरलेला कोहली जैमीनसनच्या चेंडूवर रॉस टेलरकडून झेलबाद झाला.

३१ वर्षीय कोहलीचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. कोहलीच्या निकृष्ट स्वरूपाचा अंदाज यावरून काढता येतो की तिन्ही फॉर्मेटच्या शेवटच्या १९ डावात त्याने एकही शतक केले नाही. गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये कोहलीने आपले शेवटचे शतक केले होते, तेव्हा त्याने १३६ धावांचे शतक ठोकले होते. तसेच न्यूझीलंड दौर्‍यावर त्याने सात डावांमध्ये केवळ १८० धावा केल्या होत्या, त्यामध्ये फक्त एक अर्धशतकच होता.

कोहली खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे हे पहिल्यांदा होत नाही. यापूर्वी, फेब्रुवारी २०१४ ते ऑक्टोबर २०१४ या काळात तिन्ही फॉर्मेटच्या २५ डावात एक शतकही त्याला करता आले नाही. यात इंग्लंड दौर्‍याचाही समावेश आहे ज्यात त्याने पाच कसोटी सामन्यात केवळ १३४ धावा करू शकला. त्यापूर्वी कोहलीचा खराब फॉर्म फेब्रुवारी २०११ ते सप्टेंबर २०११ या काळात दिसला होता, जेव्हा त्याने सलग २४ डावांमध्ये एकही शतक ठोकले नाही. दरम्यान, कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ७० शतके ठोकली आहेत. त्याने ८४ कसोटी सामन्यात २७ आणि २४८ सामन्यात ४३ शतके केली आहेत.