VIP नंबरसाठी मोजलेले १९ लाख रुपये चक्क ‘पाण्यात’ !

राजकोट : वृत्तसंस्था – गाडीला व्हीआयपी नंबर मिळावा यासाठी बरेच लोक भरपूर पैसे खर्च करतात. असे व्हीआयपी नंबर घेण्यामागे वेगवेगळे उद्देश असतात. उदा. दादा हे नाव गाडीच्या नंबर प्लेटवर येण्यासाठी ४१४१ हा व्हीआयपी नंबर खरेदी केला जातो. असे व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. असाच व्हीआयपी नंबर खरेदी करणे गुजरातमधील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. एका बिल्डरने गाडीला ‘०००७’ हा नंबर मिळवण्यासाठी तब्बल १९ लाख रुपयांची बोली लावली. मात्र, गुजरातमधील वाहतूक नियमांमुळे हा नंबर घेण्यामागचा उद्देश काही पूर्ण झाला नाही.

७ हा आकडा गुजराती भाषेत लिहिला तर त्याची गणपतीसारखी आकृती होते. या कारणामुळे राजकोटमधील गोविंद प्रसन्ना यांनी आरटीओमध्ये १९ लाखांची बोली लावत हा नंबर मिळवला. गाडीच्या किंमतीच्या ३३% पैसा त्यांनी फक्त या नंबरसाठी खर्च केला. मात्र, आरटीओच्या नियमानुसार गाडीचा नंबर गुजरातीत लिहिण्याची परवानगी दिली जाऊ शकत नसल्याने इतके पैसे खर्च करूनही त्यांचा उद्देश काही सफल झाला नाही. १९ लाख रुपयाचे नुकसान झाले.

विशेष म्हणजे, प्रसन्ना यांनी यापूर्वी खरेदी केलेल्या तीन गाड्यांनाही ०००७ हाच नंबर दिला होता. गुजरात राज्यात यावेळी एका नंबरसाठी प्रसन्ना यांनी लावलेली १९ लाखांची बोली सर्वात मोठी असल्याचे रस्ता आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त