रोडरोमीयोंकडून १९ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रोडरोमियोंकडून महिलांची छेडछाड करण्याचे शहरातील प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास वानवडी बाजार येथे रोडरोमियोने रस्त्याने जाणाऱ्या तरुणीकडे पाहून “क्या हिरोईन दिख रही है” म्हणत तिचा विनयभंग केला. या प्रकाराचा जाब विचारल्यानंतर तिला धमकावत ते तरुण निघून गेले. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार दोन तरुणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

मोईन वजरुद्दीन कुरेशी (४८, वानवडी बाजार) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. तर पप्पू नावाच्या २० ते २२ वर्षाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. १९ वर्षीय पिडीत तरुणीने यासंदर्भात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास वानवडी बाजार येथून जात होती. त्यावेळी मोईन कुरेशी आणि पप्पू नावाचा तरुण तेथे उभे होते. तरुणी जात असताना कुरेशीने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. तसेच “क्या हिरोईन दिख रही है” असे म्हणत तिच्याजवळ गेला. आणि त्यानंतर तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिने त्याला याचा जाब विचारला. तेव्हा मोईन को जवाब मांगती है क्या असे म्हणत तिला धमकावले. तसेच मोईन आणि पप्पू या दोघांनी तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. वानवडी पोलिसांनी मोईन कुरेशी याला अटक केली असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

शहरात रोडरोमियोंकडून महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या गेल्या आहेत. तरीही असे रोडरोमीयो महिलांची छेडछाड करत त्यांना त्रास देत असल्याचे दिसते आहे.