मुंबई बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी ‘अबु बकर’ला सौदी अरबमधून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे १९९३ साली मुंबई मध्ये साखळी बॉम्बस्फोटांसाठी स्फोटके पोहोचवणारा आरोपी अबु बकर याला सौदी अरबमध्ये अटक करण्यात आली आहे. लवकरच त्याला भारतात आणले जाणार आहे. अबु बकर अब्दुल गफूर याने बॉम्बस्फोटांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये इतर अनेक लोकांसोबत स्फोटके आणि हत्यारे चालवण्याचे कथित प्रशिक्षण घेतले होते.
अबु बकर याला झालेली अटक ही बॉम्बस्फोट प्रकरणी नाही. असे सूत्रांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर, तपासादरम्यान त्याचे नाव वगळण्यात आले होते. इतर आरोपींनी दिलेल्या जबाबातूनही त्याचे नाव वगळण्यात आले होते. सीबीआयने नोव्हेंबर १९९७ मध्ये रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. इंटरपोलनेही नोटीस जारी करत देशातील, तसेच जगभरातील सुरक्षा यंत्रणांना अबु बकरबाबत सावध केले होते. त्याला अटक करण्याचे आदेशही दिले होते.

हेही वाचा – सांगलीतील ‘त्या’ CRPF जवानाचा अपघाती मृत्यू 

विशेष म्हणजे, सौदी पोलिसांनी अबु बकरला का अटक केली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही. १२ मार्च १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांपूर्वी कटाचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये अबु बकर सहभागी होता. या बैठकांमध्ये मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम हा देखील उपस्थित होता. इतकेच नव्हे तर, साखळी बॉम्बस्फोटांनंतर अबु बकर कधीही भारतात परत आला नाही. त्याने सौदी अरबमध्येच आपले बस्तान बसवले. त्याने तिथे एका इराणी महिलेशी विवाह केल्याचेही सांगितले जात आहे.

मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास सीबीआयच्या हाती सोपवण्यात आला होता. १२ मार्च १९९३ ला मुंबईत विविध १२ ठिकाणी हे स्फोट झाले. यात २५७ लोकांचा बळी गेला होता. तर, ७१३ लोक जखमी झाले होते. २००७ मध्ये टाडा न्यायालयाने १२ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यात याकूब मेमनचाही समावेश होता. तर इतर २० दोषींना जन्मठेप झाली होती.