भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने 1 लाख रूपये घेवून फसवणूक करणार्‍या चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आमदार चंद्रकांत पाटील बोलत असून सध्या कोरोना महामारीच्या काळात मी खूप मदत कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही मला २ ते ३ लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, असे बोलणे करुन १ लाख रुपये घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी एका मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुरेश बंडू कांबळे, सौरभ आष्टी, किरण धन्यकुमार शिंदे, किरण शेंडगे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी कोथरुडमधील हरीविलास रामनाथ कासट (वय ९०) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, कासट यांना एक फोन आला होता. मी आमदार चंद्रकांत पाटील बोलत असून तुमच्या कोथरुड भागातून निवडून आलोय. कोरोना संसर्गाच्या महामारी दरम्यान मी खूप मदतकार्य केले. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही मला २ ते ३ लाख रुपयांची आर्थिक मदत द्या असे बोलणे करुन पैशांची मागणी केली.

यासंदर्भात बोलताना पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील म्हणाले, यापूर्वी सुद्धा अनेक प्रतिष्ठित लोकांना यांनी फोन करुन पैशांची मागणी केली आहे. मात्र, त्यातील अनेकांनी राजकीय नेते असे स्वतःहून फोन करत पैशाची मागणी करत नसल्याचे माहिती असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला. यामध्ये किरण शेंडगे हा चंद्रकांत पाटील यांच्या आवाजात बोलत असे. तर सुरेश कांबळे हा दादांचा पी ए सावंत बोलत असल्याचे सांगत. तसेच सौरभ आष्टी व किरण शिंदे हे दोघे रेकी करत. दरम्यान, कासट यांना चंद्रकांत पाटील यांनी पैशाने मागितले असल्याचे खरे वाटले होते. म्हणून त्यांनी ऑफिसमधील क्लार्कला आलेल्या तरुणाकडे १ लाख रुपये देण्यास सांगितले.

याआधी देखील घडला होता असाच प्रकार

यापूर्वी सर्वात प्रथम आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका डॉक्टरकडे खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी काही जणांना अटक सुद्धा केली आहे. याबाबत स्वतः चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.