मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म

ब्राझील : वृत्तसंस्था – मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून एका महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. ब्राझिलमधील साओ पावलो येथे सप्टेंबर २०१६ मध्ये शस्त्रक्रिया करून गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले होते. मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म होण्याची वैद्यकीय इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

ज्या महिलेला हे गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले तिने डिसेंबर २०१७ मध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या यशस्वी शस्त्र क्रियेमुळे आई न होऊ शकणाऱ्या महिलांना आशेचा किरण मिळाला आहे. ही वैद्यकीय इतिहासातील पहिलीच घटना आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. याबाबतचे संशोधन लानसेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

ब्राझील मध्ये ज्या ३२ वर्षीय महिलेवर गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिचा एका दुर्मिळ आजारामुळे गर्भाशयाशिवाय जन्म झाला होता. स्ट्रोकमुळे निधन झालेल्या एका ४५ वर्षीय महिलेने तिचे गर्भाशयदान केले होते. ब्राझीलच्या रुग्णालयात १० तासापेक्षा जास्त वेळ गर्भाशय प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया चालली होती. प्रत्यारोपित होणारा नवीन अवयव शरीराने नाकारु नये यासाठी महिलेला पाच वेगवेगळया प्रकारची औषधे देण्यात आली होती. पाच महिन्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये नवीन गर्भाशय शरीराने स्वीकारले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली योग्य उपचारानंतर प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म झाला.