१ मेपासून ‘या’ ४ क्षेत्रात होणार मोठे बदल ; वेळीच काळजी न घेतल्यास बसेल फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ मे पासून बँकिंग, हवाई ,रेल्वे, इंधन या क्षेत्रात मोठे बदल होणार असून त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. नवीन आर्थिक वर्ष २०१९-२० सुरु होऊन जवळपास १ महिना पूर्ण होत आला आहे. एप्रिलमध्ये महिन्यामध्ये अनेक नवीन नियमांची अंमलबजावणी झाली. त्याचप्रमाणे काही नवीन नियम मे महिन्यापासून लागू होणार आहेत. १ मे पासून SBI च्या ग्राहकांना आधीच्या व्याजाच्या तुलनेत बचत खात्यावर कमी व्याज मिळणार आहे. तर पीएनबी PNB Kitty ही डिजिटल वॉलेटची सेवा बंद करणार आहे तर घरगुती गॅसची नवी किंमत लागू होणार आहे.

१) बॅंक –

I)  SBI – मागील काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या अनेक सेवांमध्ये बदल करत आहे. १ मेपासून SBI बँकेच्या ठेवी आणि कर्ज व्याज दर RBI च्या बेंचमार्क दराशी जोडले जातील.त्याचा आरबीआयच्या रेपो दर बदलणे , बँकेच्या ठेवी आणि कर्ज दरावर परिणाम होईल. मात्र हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळेल. हा नियम केवळ १ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी आणि कर्ज व्याजदरांवर लागू होईल.

II) PNB – पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या ग्राहकांना डिजिटल वॉलेट मधील रक्कम ३० एप्रिलपर्यंत खर्च करण्यास सांगितली आहे किंवा त्वरित निधी हस्तांतरण सेवेद्वारे (IMPS) आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी संगितली आहे.
थोडक्यात १ मे पासून पीएनबीच्या ग्राहकांना (PNB Kitty) ऐवजी दुसरे पर्याय किंवा डिजिटल वॉलेट वापरणे आवश्यक आहे. जर ग्राहकांनी आपल्या डिजिटल वॉलेटमधून पैसे काढले नाही तर अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

२) रेल्वे – भारतामध्ये सर्वाधिक प्रवास हा रेल्वेनं केला जातो. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना १ मे पासून विशेष सुविधा मिळणार आहे. ट्रेन प्रवासाचं आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडलं आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. मात्र अशी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही. बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी २४ तासांवरून ४ तासांवर आणला आहे. ट्रेनचा चार्ट लागण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे.

३) हवाई क्षेत्र – एअर इंडियाच्या विमानाचं तिकीट २४ तासांचा आत रद्द केल्यास आपल्याला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. तसेच जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यानंतर स्पाइसजेट, गोएअर आणि इंडिगो यांनी वेगळ्या मार्गांवर विमान सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. मे महिन्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांवर विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय १ मे रोजी जेट एअरवेजच्या प्रवाशांच्या तिकिट रिफंड करण्यासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे.

४) घरगुती गॅस – १ एप्रिलला घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी बिना सबसिडीच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ५ रुपये प्रति सिलिंडरची वाढ केली आहे. तर सबसिडीवाले सिलिंडरच्या किमतीत २५ पैशांची वाढ केली आहे. दिल्लीत इंडेनच्या १४. २ किलोच्या बिना सबसिडी सिलिंडरची किंमत ७०६. ५० रुपये झाली असून १ मेपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहे.