2.0 च्या विरोधात मोबाइल कंपन्या संघटित प्रदर्शनापूर्वीच 2.0 वादात अडकला

मुंबई  : वृत्तसंस्था – प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असणारा 2.0 नविन एका वादात सापडला आहे. दूरसंचार कंपन्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे धाव घेतली असून  प्रदर्शनाच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांमध्ये दूरसंचार क्षेत्राबाबात चुकीची माहिती देत असल्याचा दावा कंपन्यानी केला आहे .
या चित्रपटाला दिलेल्या प्रमाणपत्रात मागे घ्यावं, अशी याचिका सेल्यूलर ऑपरेटर ऑफ इंडिया या संघटनेनं सेन्सॉर बोर्डाकडे दाखल केली आहे. या चित्रपटाच्या तामिळ भाषेतील टीझर, ट्रेलर आणि अन्य प्रमोशनल व्हिडिओसाठी देण्यात आलेलं प्रमाणपत्र तातडीनं मागे घेण्यात यावं  तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देऊ नये, अशी विनंती आम्ही सेन्सॉर बोर्डाला केली आहे, असं सेल्यूलर ऑपरेटर ऑफ इंडिया संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितलं.
2.0’मध्ये ज्याप्रकारे मोबाईल सर्व्हिस व टॉवर्सला दाखवण्यात आले आहे, ते संपूर्णत: निराधार, चुकीचे व काल्पनिक आहे. हे सगळे टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे, असा ठपका असोसिएशनने आपल्या तक्रारीत ठेवला आहे. सेन्सॉर बोर्ड व माहिती व प्रसारण मंत्रालयाने नव्याने पडताळणी करेपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली जावी,अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.
मोबाइल टॉवर आणि फोनची बदनामी होईल, अशी काही दृश्ये चित्रपटात चित्रित करण्यात आली आहेत. त्यामुळे जनसुमदायामध्ये याबाबत चुकीचा संदेश जाऊन त्याचा नकारात्मक परिणाम दूरसंचार क्षेत्रावर होऊ शकतो, असाही  दावा त्यांनी केला आहे. आता सेन्सॉरबोर्ड याबाबत काय निर्णय घेणार  याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे .