विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाची तोडफोड करणारे दोघे अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखलीतील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. कार्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत झालेल्या भांडणातून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर तोडफोडच्या निषेधार्थ शनिवारी दिवसभर चिखली, मोरेवस्ती, साने चौक, कृष्णानगर या बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिकांनी आज कडकडीत बंद पाळला.

देवेंद्र बीडलांन (रा. औंध रोड, खडकी), सॅमसंग (रा. खडकी) या दोघांना अटक केली आहे. तर इतर फरार आहेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या साने चौक येथील कार्यालयाची काही हल्लेखोरांनी हत्यारांसह तोडफोड केली. कार्यालयातील कर्मचारी महिलेला मारहाण केली. कार्यालयाचे मोठे नुकसान केले. भर चौकात, रहदारीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने व्यापारी आणि छोट्या – मोठ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यातील गुन्हेगार सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाले आहेत. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास कार्याला गती दिली. १२ तासाच्या आत हल्लेखोरांना ताब्यात घेण्याचा इशारा देखील साने यांनी दिला.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्त चिखलीतील साने चौक, मोरे वस्ती, कृष्णानगर भागातील दुकाने दिवसभर बंद आहेत. व्यापारी, व्यावसायिकांनी आज कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केला आहे. दुपारी साडेचार वाजेपर्यंत या भागातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

भोसरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर अवताड़े, देवेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी दोघांना ताब्यात घेऊन चिखली पोलिसांकडे स्वाधीन केले. साने यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणासोबत झालेल्या वादातुन हा प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे.