नाशिकमध्ये भल्या पहाटे ‘थरार’, ATM फोडणाऱ्या दोघांना ‘फिल्मी स्टाईल’नं पकडलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन फोडून पळून घेऊन जाणाऱ्याच्या तयारी असलेल्यांचा पाठलाग करुन त्यातील दोघांना पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून गेलेल्यांचा पाठलाग शहरातील गस्त घालणाऱ्या सर्व पोलीस व्हॅन करु लागल्या. त्यामुळे पळून जाताना चोरट्यांनी आपली गाडी एका गल्लीत घातली. मात्र, या गल्लीला पुढे रस्ता नसल्याने ते अडवून पडले. पुढे रस्ता बंद तर मागे पोलिसांची व्हॅन अशा स्थितीत पळून जाताना तिघांपैकी दोघे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

याबाबतची माहिती अशी, नाशिकमध्ये बँकांचे एटीएम मशीन चोरुन नेल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले असल्याने पोलिसांनी रात्री गस्त घालताना हद्दीतील एटीएम सेंटर चेक करण्याचा आदेश बीट मार्शल यांना दिला आहे. त्यानुसार सातपुरा पोलीस ठाण्याचे झोले, भेंगडे आणि आव्हाड हे पोलीस मार्शल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्र्यंबक रोडवर गस्त घालत असताना त्यांना आयसीआयसी बँकेच्या एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन तिघा चोरट्यांनी फोडून बाहेर आणलेले दिसले. ते पाहिल्यावर ते तातडीने तेथे जाऊ लागले. पोलिसांना आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून चोरट्यांनी एटीएम मशीन तसेच टाकून गाडीत बसून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या अंगावर गाडी घालून ते पळून गेले.

पोलिसांनी ही माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्याबरोबर शहरातील गस्त घालणाऱ्या सर्व मोबाईल व्हॅन पळून जाणाऱ्या चोरट्यांचा माग घेऊन त्यांचा पाठलाग करु लागल्या. आपल्या मागे पोलीस लागल्याचे समजल्यावर त्यांना चुकविण्यासाठी त्यांनी मुख्य रस्त्यावरुन आपली गाडी एका गल्लीत घातली. आणि तेथेच त्यांचा घात झाला. कारण या गल्लीला पुढे रस्ताच नव्हता. पुढे रस्ता बंद असल्याने ते अडकून पडले. पाठोपाठ पोलीस व्हॅन तेथे येत असल्याचे पाहून त्यांनी गाडी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यातील दोघांना पोलिसांनी पकडले.

Visit : policenama.com