अजबच ! ‘या’ कंपनीत मोबाईल चोरल्यावर मिळते २ दिवस सुट्टी

नई दिल्ली : वृत्तसंस्था – आजवर गुन्हेगारी टोळ्यांना विशेषत: दाऊदच्या टोळीला ‘डी’ कंपनी म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता गुन्हेगार आपल्या टोळ्या एखाद्या कंपनीप्रमाणे चालवू लागले आहेत. अगदी इतर कंपन्यांप्रमाणे त्यांच्या सदस्यालाही पगार, कामाबद्दल इन्सेटिव्ह, पगार दिला जात असल्याचे पोलिसांनी एका टोळीला केलेल्या अटकेनंतर समोर आला आहे.

दिल्ली पोलिसांनी या टोळीचा प्रमुख सरदार चमन लाल याला अटक केली. त्याच्याकडील चौकशीतून ही बाब समोर आली आहे. चमन लाल याचा उजवा हात असलेल्या बोपी विश्वासने ओमप्रकाश आणि ज्ञानेश या दोघांना त्यांच्या कंपनीत नोकरी दिली. याशिवाय आणखी काही जणांचा या कंपनीत समावेश असण्याची शक्यता आहे. ही टोळी महिन्याच्या पहिल्या १० दिवसांमध्ये सर्वाधिक काम करायची. दिल्लीतील कोणत्याही भागातून ते मोबाईल लंपास करायचे. ही टोळी दिवसाकाठी ७ ते ८ मोबाईल लंपास करायची.

टोळीतील प्रत्येकाला टार्गेट पूर्ण केल्यावर म्हणजे मोबाईल चोरल्यावर दररोज वेतन दिले जाते. या शिवाय आठवड्यातून दोन सुट्ट्या देखील दिल्या जातात. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाला दिवसाला ५०० रुपये पगार दिला जातो. याशिवाय नॉन व्हेज जेवण व दारु देण्यात येते. प्रत्येकाला मोबाईल चोरण्याचे टार्गेट पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात येते. आठवड्यातून पाच दिवस काम करावे लागते. शनिवार रविवार सुट्टी असते, अशी माहिती टोळी प्रमुख चमनलाल याने पोलिसांना दिली.