Nashik News : घरगुती गॅस सिलिंडर बदलताना भडका; 2 महिलांचा मृत्यू तर सहाजण जखमी

नाशिकः पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती गॅस सिलिंडर बदलताना उडालेल्या भडक्यात गंभीररित्या भाजलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. वडाळा नाका परिसरातील संजरीनगर अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये शुक्रवारी (दि. 2) मध्यरात्री ही घटना घडली. रेग्युलेटर बदलताना गॅस गळती झाल्याने आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नसरीन नुसरद सय्यद (वय 25) आणि सईदा शरफोद्दीन सय्यद (वय 49) असे उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर सय्यद नुसरत रहीम (वय 25), शोएब वलिऊल्ला अन्सारी (वय 28) , मुस्कान वलिऊल्ला सय्यद (वय 25), आरिफ सलिम अत्तार (वय 53), सय्यद लियाकत रहीम (वय 32) आणि रमजान वलिऊल्ला अन्सारी (वय 22) आदी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजरीनगर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 7 मध्ये राहणाऱ्या सय्यद कुटुंबीयांच्या घरातील सिलिंडर संपले होते. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडून आणलेला सिलिंडर शुक्रवारी मध्यरात्री बदलत होते. रेग्युलेटर लावताना गॅस गळती झाली. गळतीमुळे आग भडकेल म्हणून घरातील पुरुषांनी पाण्याने भरलेल्या पिंपात सिलिंडर ठेवून दिला होता. यावेळी घरभर पसरलेल्या गॅसने पेट घेतला. यावेळी स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी त्वरित धाव घेत घरातील महिला व मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. एका टॅम्पोतून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. दुर्घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. दुर्घटना झालेल्या फ्लॅटमध्ये 3 गॅस सिलिंडर रिकामे आढळले. तसेच आगीचा भडका उडाल्यावर अपार्टमेंटमधील रिकामे व भरलेले सिलिंडर खाली आणले गेले. यामुळे मध्यरात्री या परिसरात सिलिंडरची लाईन दिसली. 15 ते 16 सिलिंडर सुरक्षितस्थळी ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.