Coronavirus : चिंताजनक ! पुण्यात सकाळपासून 2 ‘करोना’बाधितांचा मृत्यू, शहरात 44 नवे रूग्ण आढळले

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुण्यात आज आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. ससूनमध्ये ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ट्विटद्वारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, मृत्यू झालेल्यांपैकी त्यापैकी एकजण ७३ वर्षांचा होता. त्यांना किडनीचा आजार होता. भवानी पेठेत राहणाऱ्या या व्यक्तीला १३ एप्रिल रोजी ससूनमध्ये भरती करण्यात आले होते. तर दुसरा व्यक्ती ३४ वर्षांचा असून त्याला लठ्ठपणाचाही त्रास होता. त्याला कालच ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच हे लोक राहत असलेला परिसर सील करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यात आज नव्या ११७ रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात नव्या ११७ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. महत्वाची बाब म्हणजे यापैकी ६६ मुंबई येथील आहेत तर ४४ नवे रुग्ण पुण्यातील आहेत. तर या वाढलेल्या रुग्णांमुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 2801 वर पोहचला आहे. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

पुण्यातील हे भाग सील

पुण्यात देखील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील २२ पेक्षा जास्त भाग सील करण्यात आले आहेत . खडक, बंडगार्डन, विश्रांतवाडी, खडकी आणि येरवडा पोलीस ठाण्याचे बहुतांश भाग तर सिंहगड रोडवरील राजीव गांधी नगर, दत्तवाडीमधील पर्वती-शिवदर्शन, वारजेमधील रामनगर-गोकुळनगर-तिरुपतीनगर आणि कोथरूडमधील केळेवाडी-सुतारदरा-जयभवानीनगर हे भाग सील करण्यात आले आहेत.