१ लाखाची लाच घेताना ‘जीएसटी’चे (GST) बडे मासे ‘सीबीआय’च्या (CBI) जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील वस्तू व सेवा कर (जीएसटी)च्या २ अधिकाऱ्यांना १ लाखांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या तपास पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराला २०१६-१७ च्या सेवा कराची पुर्तता करण्यासाठी त्यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. त्याचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्विकारताना दोघेही जाळ्यात अडकले असून विवेक देकाते आणि संजिव कुमार अशी त्यांची नावे आहेत.

याप्रकरणी दोघा जीएसटी अधिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्याही घरांची आणि कार्यालयांची झडती घेण्यात आली असून तेथून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि स्थावर मालमत्ता तसेच सोने चांदीचे दागिने, रोकड, संगणकाच्या हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत.

तक्रारदार यांना २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या सेवा कराचे दायित्व पुर्तता करण्यासाठी दोघा जीएसटी अधिक्षकांनी ३ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये मागितले. तक्रारदाराची त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सीबीआयकडे याची तक्रार केली. सीबीआयच्या इन्वेस्टीगेशन विभागाने याची पडताळणी केल्यावर दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदाराकडून या लाचेचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्विकारताना पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्यातील सीबीआय विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.