कुमारस्वामी सरकारला हादरा ; अपक्षांनी पाठिंबा काढला

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकात सरकार स्थापन होऊन अवघे काही महिनेच झाले असताना आता पुन्हा एकदा सत्तेसाठी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. २ अपक्ष आमदारांनी राज्यातील काँग्रेस-निजद सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात आले आहे.

कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडी वेगाने सुरू असल्याने राजकीय अस्थिरता वाढली आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आज मकरसंक्रांत आहे. त्यामुळे याच दिवशी सरकार बदलावं, असं मला वाटतं. सरकार हे कार्यक्षम असलं पाहिजे, असे अपक्ष आमदार आर. शंकर म्हणाले आहेत. तर एच. नागेश यांनीही पाठिंबा काढल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचे पक्ष स्थिर सरकार देतील, अशी आशा होती. त्या दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही सामंजस्य नाही. त्यामुळेच काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून मी भाजपाला पाठिंबा देणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडायचेच, अशी रणनिती भाजपकडून अवलंबिली जात आहे. त्यासाठी भाजपकडून तीव्र हालचाली सुरू आहेत. यामुळे राज्यातील काँग्रेस-निजदची चिंता वाढली असून यामुळे राजकीय अस्थिरता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला होता. तर काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला होता.

ए. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. दरम्यान, राज्यातील सरकार स्थिर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. राज्यातील सरकार पाच वर्षे कालावधी पूर्ण करेल, असा दावा कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.