इनोव्हा – ट्रकच्या भीषण अपघातात २ ठार ४ गंभीर जखमी

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – ईनोव्हा आणि ट्रकच्या भीषण अपघातात २ ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास गोंदिया-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झाला. अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
रोशन ठकरांनी (वय -४५ ), मीरा ठकरांनी (वय – ६८) यांचा जागीच मृत्यू झाला असून सपना ठकरांनी (वय- ४०), चंचल ठकरांनी (वय -१७), हर्ष ठकरांनी (वय – १२) आणि इनोव्हा चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील देवरी पासून आठ किमी अतंरावरील मरामजोब घाटामध्ये हा अपघात झाला. गोंदियावरुन रायपूरकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरुन इनोव्हा कार भरधाव वेगात जात होती. घाटात अपघात प्रवण असल्यामुळे इनोव्हा कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. इनोव्हा कार समोरुन येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.