मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, GST उपायुक्तांचा मृत्यू

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (मंगळवार) सकाळी आठच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ झाला. अपघातात अभिजित रामलिंग घवले (वय-45 रा. माजगाव, मुंबई) आणि शंकर गौडा यतनाल (वय-45) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले अभिजित घवले हे जीएसटी डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या इनोव्हा कारचा पुढचा टायर फुटला. यामुळे इनोव्हा कार पुढे जाणाऱ्या मालट्रकवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर शिल्पा अभिजित घवले (वय-40) आणि पंडित खंडू पवार (वय-37 हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर समाटणे फाटा येथे उपचार सुरु आहेत. शिल्पा या मृत अभिजीत यांच्या पत्नी आहेत. तर पंडित पवार हा कारचा चालक आहे.

आई-वडीलांची भेट झालीच नाही
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित घवले यांच्या आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे कार्यक्रमासाठी अभिजित घवले हे त्यांच्या पत्नी शिल्पा, साडू शंकर यतनाल हे इनोव्हा कारने लातूरला गावी निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. कारचे टायर फुटल्याने अभिजित यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.