पुणे : पीएमपी प्रवासादरम्यान १.७५ लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गर्दीचा फायदा घेऊन पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. तळेगाव ढमढेरे ते चंदननगर मार्गावरील बसने प्रवास करताना शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

याप्रकरणी ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे शिरुरचे राहणारे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील पतसंस्थेतून पावणे दोन लाखांचे कर्ज काढले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर पावणेदोन लाखांची रोकड त्यांनी घेतली. त्यांचा मुलगा नगर रस्त्यावरील चंदननगर भागात राहण्यास असल्याने ते चंदननगर येथे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी तळेगाव ढमढेरे ते चंदननगर या मार्गावरील बसमधून ते शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता चंदननगर येथे जाण्यासाठी निघाले. त्यानंतर चंदननगर येथे बस थांबल्यानंतर तक्रारदार मुलाकडे जायला निघाले. त्यावेळी त्यांना खिशात पैसे नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी चोरट्यांनी कोपरीचा खिसा कापून रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक आनंद पिंगळे तपास करत आहेत.