महिला सहकारी अधिकार्‍यासह दोघी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन- पतसंस्थेच्या व्यवस्थापकाकडून संबंधित पतसंस्थेचे तपासणी अहवालाचे शेरे अनुकुल करून देण्यासाठी 50 हजार रूपयाची लाच घेणार्‍या महिला सहकार अधिकारी आणि तिच्या खासगी साथीदार महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवारी) जंगली महाराज रोडवरील हॉटेल पांचालीमध्ये रंगेहाथ पकडले आहे. महिला सहकार अधिकार्‍यास 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने उपनिबंधक कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

उर्मिला नामदेव मदने (48, सहकार अधिकारी वर्ग-2, उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, गुलटेकडी) आणि पल्‍लवी विलास पाटील (32, रा. पीएमसी कॉलनी, गोखलेनगर) अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. उर्मिला मदने या सहकारी अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदार या एका पतसंस्थेच्या व्यवस्थापक म्हणुन काम पाहतात. त्यांच्या पतसंस्थंचे तपासणी अहवासलाचे शेरे अनुकुल करून देण्यासाठी उर्मिला मदने यांनी 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये मदने या 50 हजाराची लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले.

त्यानंतर मदने यांच्या सांगण्यावरूनच पल्‍लवी विलास पाटील यांनी तक्रारदाराकडून 50 हजार रूपयाची लाच स्विकारली. लाच स्विकारताना सरकारी पंचासमक्ष पल्‍लवी पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक शेडगे, एएसआय ढवणे, पोलिस कर्मचारी कुर्‍हे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालु असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.