बारामती : अंगावर खाजेची पावडर टाकून अडीच लाखाची रोकड लंपास

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन –  खाज सुटण्याची पावडर अंगावर टाकून कर्मचा-याचे लक्ष विचलित करून त्याच्याजवळील सुमारे 2 लाख 41 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. बारामती शहरातील भिगवण चौकात गुरुवारी (दि. 4) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्वप्निल विलास पवार (रा. इको व्हिलेज बिल्डींग, कसबा, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे येथील महालक्ष्मी ॲटोमोटीव्ह प्रा. लि. मध्ये काम करतात. शोरुमचे संचालक सचिन सातव यांच्या घरून त्यांनी 1 लाख 41 हजार 800 रुपयांची रक्कम घेऊन ते भिगवण चौकातील बारामती सहकारी बॅंकेत आले. त्यानंतर बॅंकेतून एक लाख रुपये काढून त्यांनी ते बॅगेत ठेवले. चालत ते दुचाकीकडे येत होते. त्यावेळी तोंडाला पांढरा रुमाल बांधलेल्या एका युवकाने किस का पैसा निचे गिरा है, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. फिर्यादीने खाली पाहिले असता त्याठिकाणी 10, 20 रुपयांच्या नोटा पडल्या होत्या. फिर्य़ादी त्या घेण्यासाठी खाली वाकले असता त्यांच्या मानेवर व कॉलरवर काही तरी पडल्याची जाणीव त्यांना झाली. मान खाजवू लागल्याने ते जवळच्या चहाच्या गाड्यावर जावून बॅग स्टुलावर ठेवून मान धुवत होते. त्यावेळी कोणीतरी त्यांची बॅग लंपास केली. बॅगेत 2 लाख 41 हजार रुपयांची रोकड, महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट, चेकबुक, पासबुक, एटीएम असे साहित्य होते.