‘आम्ही कटारियन्स 1985’च्या बॅचकडून कोरोनावरील उपचारासाठी फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध कुंभारगावला 2 लाखाची मदत !

पुणे : कटारिया हायस्कूलच्या ‘आम्ही कटारियन्स 1985’ या दहावीच्या बॅचतर्फे भिगवणजवळील कुंभारगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुमारे 2 लाख रुपये किंमतीची कोरोनावरील उपचारासाठीची औषधं, ऑक्सिमीटर व थर्मामीटर देण्यात आले. फ्लेमिंगो पक्षासाठी कुंभारगाव प्रसिद्ध असून उजनीच्या बॅक वॉटरला लागून हे गाव वसलं आहे.

आम्ही कटारियन्स 1985 बॅचचे संजीव फडतरे हे प्रसिद्ध पक्षी छायाचित्रकार आहेत. आणि कुंभारगाव येथील फ्लेमिंगो पक्षांची छायाचित्रे काढण्यासाठी ते नेहमी त्याठिकाणी जातात. कुंभारगावातील नागरिक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्याशी त्यांचा संपर्क आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरली. मुंबई, पुण्याबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने झाल्याचे चित्र आपण पाहिले. शहराच्या ठिकाणीच उपचार मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे ग्रामीण भागात तर, हे चित्र आणखी भयावह होतं. कोरोनाचा फैलाव वाढत असताना शहरात अनेक सामाजिक संस्था, उद्योजक मदतीसाठी पुढे आले. अशीच गरज ग्रामीण भागात देखील होती. म्हणून आम्ही कटारियन्स 1985 च्या बॅच ने ग्रामीण भागात मदत द्यायचे ठरवले, असे संजीव फडतरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात मदत देण्याचं निश्चित झाल्यानंतर आम्ही कुंभारगाव येथील प्रत्यक्ष माहिती घेतली. आणि माझ्यासह संजीव पाठारे, राजेश मेहता, सलील बर्वे, समीर देशमुख, राहुल पाठक, श्रीपाद लिमये आदी आम्ही कटारियन्स 1985 च्या बॅचमधील मित्रांनी पुढाकार घेतला. आम्हाला श्री विनायक या औषध वितरकांनी मदत केली आणि आम्ही औषधे, ऑक्सिमीटर, थर्मामीटर असं साहित्य कुंभारगावला दिले. यामुळे कोरोना रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यास मदत होणार आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. ग्रामीण भागात मदतीची नित्तांत आवश्यकता असून त्यासंदर्भात मदत करु शकणाऱ्यांनी विचार करावा, असेही संजीव फडतरे यांनी सांगितले.