2 पेंटरनी INS विक्रांतवरून चोरल्या 4 हार्ड डिस्क अन् मेमरी कार्ड

पोलिसनामा ऑनलाईन – रंगरंगोटीचे काम करीत असताना दोन पेंटरने आयएनएस विक्रांतवरुन मागच्यावर्षी चार हार्ड डिस्क आणि अन्य वस्तुंची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. . या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी बिहारमधून दोघांना अटक केली. आयएनएस विक्रांतसंबंधी संवेदनशील माहिती असल्याने हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. आयएनएस विक्रांत ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. कोचीन शिपयार्डमध्ये या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे. पुढच्यावर्षीपर्यंत ही युद्धनौका सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे.

दोन्ही आरोपी दोन वर्षांपूर्वी युद्धनौकेवर पेंटिंगचे काम करत होते. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सीएसएलच्या महाव्यवस्थापकांनी केरळ पोलिसात चोरीची तक्रार नोंदवली. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. चोरीच्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर चूक, त्रुटी समोर आल्या आहेत. आता एनआयएच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात येत आहे. युद्धनौकेवरील संगणक खोलून त्याचे सुट्टे भाग करुन ठेवले होते. उच्च सुरक्षा असलेल्या परिसरातून चार हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, प्रोसेसर आणि अन्य वस्तूंची चोरी झाली. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. आयटी सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर चोरीची ही घटना समोर आली. देखरेख करण्यासाठी तिथे कुठलीही सीसीटीव्हीची व्यवस्था नव्हती.

एनआयएने गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सीआयएसएफ, सीएसएल, कंत्राटी कामगार आणि अन्य असे मिळून एकूण 1 हजार 200 जणांचे बोटांचे ठसे घेतले होते. या चोरीबद्दल कुठलीही माहिती देणार्‍याला पाच लाखाचे इनामही जाहीर केले होते. आयएनएस विक्रांतच्या बांधणीमध्ये देशातील वेगवेगळया यंत्रणा सहभागी आहेत. देशातील हा एक अत्यंत प्रतिष्ठेचा संरक्षण प्रकल्प आहे. आयएनएस विक्रांत पुढच्यावर्षी देशसेवेत दाखल होईल. या युद्धनौकेमुळे भारताचा अमेरिका, रशिया, चीन, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स या देशांच्या पंक्तीत समावेश होणार आहे. या देशांकडे विमानवाहू युद्धनौका उभारणीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.