Coronavirus : अधिवेशनाआधीच काही आमदारांसह विधिमंडळातील 40 जण ‘कोरोना’बाधित

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. मात्र, अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 2 आमदारांसह 40 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

अधिवेशनात हजर राहणारे मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी, पत्रकार, सुरक्षा कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस आरोग्य विभागाच्या वतीने विधान भवनाच्या बाहेर चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, 2 आमदारांसह 40 अधिकारी, कर्मचार्‍यांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली. अधिवेशनासाठी येणार्‍या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे.

विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत. अंतर नियमांचे पालन केले जावे, यासाठी सर्वत्र सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत. काही सदस्यांना गॅलरीत बसवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन संबंधित पक्षांच्या प्रतोदांकडे सोपवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मागील दोन दिवसांत उद्योगमंत्री सुभाष देसाई, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य मंत्री, आमदार अशा एकूण 2200 जणांनी चाचणी करण्यात आली आहे.