coronavirus : ‘धारावी’त आणखी 2 कोरोना ‘पॉझिटिव्ह’, एकूण ७ जणांना झाली बाधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धारावी या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा भाग असलेल्या परिसरात आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. धारावीतील डॉ़ बलिगा नगर येथील ३० वर्षाच्या महिलेच्या संपर्कात आले होते. त्यात एक ८० वर्षांचे वडिल आणि दुसरे ४९ वर्षांचे भाऊ आहे. त्यामुळे आता धारावीत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ७ झाली आहे. त्यातील ६ जण उपचार घेत असून एकाचा मृत्यु झाला आहे.

धारावीत पहिला रुग्ण सापडल्यानंतर या भागात १०० टक्के लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. धारावीतील एकाच ठिकाणी हे सर्व बाधित आढळले नसून धारावीच्या वेगवेगळ्या भागात ते आढळून आले आहेत. त्यात डॉ. बलिगानगरमध्ये ४ असून त्यातील एकाचा मृत्यु झाला आहे तर एक उपचार घेत आहे. २ नवीन रुग्ण आहेत. वैभव अपार्टमेंटमध्ये १ जण आहेत. मुकुंदनगर आणि मदिना येथे प्रत्येकी एक जण बाधित आढळून आला आहे.

मुंबई व परिसरातील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 526 झाली आहे. पूर्वी मुंबईत दररोज ४ ते ५ नवीन रुग्ण सापडत होते. आता त्यांची संख्या दररोज ५० च्या पटीत वाढत आहे. त्यामुळे मुंबईची चिंता अजून वाढू लागली आहे. मुख्य म्हणजे परदेशातून आलेल्या व्यक्तींकडून पूर्वी स्थानिकांना लागण झाल्याचे दिसून येत होते. आता स्थानिकांकडून स्थानिकांना लागण झाल्याचे दिसून येऊ लागले आहे.