दुर्देवी ! मुंबईत 2 डॉक्टरांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू, ICU बेडसाठी दोन दिवस पाहिली वाट

मुंबई : पोलीनामा ऑनलाइन –  मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, मुंबईत आणखी दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला असून यातील एका डॉक्टरला आयसीयू बेडसाठी तब्बल दोन दिवस प्रतिक्षा करावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरातील 51 वर्षीय डॉक्टरला कोरोना संसर्ग झाला होता. त्यांचा 26 मे रोजी लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात अर्थात सायन रुग्णात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंदेरी पूर्व येथील एका आयुर्वेदिक डॉक्टरचा कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी सौमय्या रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन मृत्यूमुळे मुंबईतील डॉक्टरांच्या बळींची संख्या 5 झाली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रॉम्बे येथील डॉक्टरला 24 मे रोजी त्यांच्या मुलाने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आयसीयू बेड उपलब्ध नव्हता. प्रतीक्षा यादीत त्यांचा 41वा क्रमांक होता. त्यामुळे जास्त रुग्णांची संख्या असलेल्या अपघात विभागात त्यांना राहावं लागलं. त्यांच्या मुलानं यासंदर्भात माहिती दिली. बेडच्या कमतरतेमुळे रुग्णांना दोन बेडच्या मध्ये फरशीवर झोपावं लागलं. 25 मे रोजी दुपारी वडिलांना कोविड कक्षात दाखल करण्यात आलं. परंतु तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढलेला होता. वडीलांना बेड देण्यात यावा अशी विनंती डॉक्टरांना केली. पण तुझ्या वडिलांसारखे अनेक रुग्ण आहेत. कुणाकुणाला बेड द्यायचा, असं उत्तर डॉक्टरांनी दिल्याची माहिती मुलाने दिली.

यावर सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं, कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा सामना करण्यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या वाढवून 430 करण्यात आली आहे. मुंबई शहरात सर्वाधिक रुग्ण आमच्याकडे येत आहेत. काही प्रमाणात हे कोविड रुग्णालयच झालं आहे. आम्हाला कोरोनाग्रस्त आणि कोरोना नसलेले अशा दोन्ही रुग्णांवर उपचार करावे लागतात, असे त्यांनी सांगितलं.