पुणे : बसची वाट पाहात असलेल्या तरुणाला मारहाण करत लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बसची वाट पाहात उभ्या असलेल्या एकाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करत लुबाडल्याची घटना स्वारगेट येथील कात्रज पीएमपी बसस्टॉपवर पहाटे अडीचच्या सुमारास रविवारी घडली. तरुणाकडून एकूण ७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

याप्रकरणी विशाल सावंत (३५, के. के. मार्केट कात्रज रोड) यांनी फिर्याद दिली असून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काम संपवून रविवारी पहाटे घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ते स्वारगेट येथील कात्रजच्या पीएमपी बस थांबणाऱ्या स्टॉपवर उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून दोनजण त्यांच्याजवळ आले. त्यानंतर सावंत यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा ७ हजार ५०० रुपये असा ऐवज हिसकावला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.