अवैध धंदेवाल्याशी सलगी ठेवणाऱ्या २ पोलीस अधिकाऱ्यांसह ६ पोलीस निलंबीत

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – सूचना देऊनही अवैध धंदे बंद न करता अवैध धंदेवाल्याशी सलगी ठेवणाऱ्या आणि लाचखोरी करून पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी आक्रमक पवित्रा घेत तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. तर एका पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड,  पोलीस नाईक रामप्रसाद पहुरे यांच्यासह कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रामेश्वर जाधव, कपिल जाधव, इंद्रजित काळेबाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष सावंत आणि सदाशिव राठोड यांचा समावेश आहे. तर मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी आदेश दिले होते. अधीक्षकांनी अदेश देऊनही काही ठिकाणी अवैध धंदे सुरु होते.

मंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एडीएसने धाड टाकून अवैध धंद्याविरुद्ध कारवाई केली होती. अवैध धंदे बंद करण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांची मंठा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी आमदार रमेश कदम याला जालना न्यायालयात हजेरी लावण्यासाठी आणले होते. त्याला मुंबईला परत घेऊन जात असताना त्याच्यासाठी अलिशान खासगी वाहनाचा वापर केल्याप्रकरणी नियंत्रण कक्षात नेमणुकीला असलेले सहायक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे आणि पोलीस नाईक रामप्रसाद पहुरे यांना देखील तडकाफडकी निलंबित केले आहे. काकडे याच्यावर सहा महिन्यांपूर्वीच एका लाचखोरीच्या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात असताना कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणात त्याला निलंबीत करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तो नियंत्रण कक्षात रुजू झाला होता. त्यात पुन्हा राम कदम प्रकरणात कारवाई झाली आहे.

तीर्थपुरी येथे वाळूची वाहने सोडण्यासाठी १ लाख २० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले गोंदीचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. मागील महिन्यात जुन्या जालन्यातील एका पत्त्याच्या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली होती. यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी क्लब मालकाची स्वतः चौकशी केली होती. या क्लबचालकाशी कदीम जालना पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे दोन, अशा पाच पोलिसांचे संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. या सर्व ५ कर्मचाऱ्यांना चैतन्य यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. यामध्ये कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रामेश्वर जाधव, कपिल जाधव, इंद्रजित काळेबाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष सावंत आणि सदाशिव राठोड यांचा समावेश आहे.