श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’च्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शोधमोहीम सुरु असताना सुरक्षा दल आणि दहतशतवाद्यांच्या उडालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. दुसरीकडे शोपिया येथील सचिवालयात तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, दक्षिण काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सुरक्षादलाला मिळाली होती. हे दहशतवादी मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या माहितीनंतर परिसरात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची धाव घेतली. नंतर संपूर्ण भागात घेराव घालून शोधमोहीम सुरु केली.

सुरक्षा दलाच्या जवानांची शोध मोहीम सुरु असतानाच अचानक दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दहशवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर देत जोरदार गोळीबार केला. दहशतवादी पळून जावू नये म्हणून रात्रभर या परिसरात घेराव घालण्यात आला होता. सकाळी दोन्ही लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. सुरक्षा दलाला घटनास्थळावर मोठा शस्त्र साठा सापडला आहे.

दरम्यान, आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास शोपियांमध्ये सचिवालयाचे गेटवर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे.