हिमालयीन व्हायग्रा’वरून दोन गावांमध्ये संघर्ष विकोपाला ; कलम १४५ लागू

उत्तराखंड : वृत्तसंस्था – हिमालयीन व्हायग्रा’ किंवा ‘यासरगुंबा’ म्हणून ओळखली जाणारी ही बुरशी जगातील सर्वात महागडी बुरशी आहे. हिमालयीन व्हायग्राच्या मालकी हक्कावरून दोन गावांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ही बुरशी कर्करोगावर परिणामकारक आहे. नपुंसकता तसेच इतरही समस्यांवर ही जणू संजीवनी आहे, असे स्थानिक लोक मानतात. अजूनही त्यांच्या दाव्याला वैज्ञानिक मान्यता मिळालेली नसली तरी तिला मोठीच मागणी आहे.

कलम १४५ लागू-

उत्तराखंडमधील पिठोरागड जिल्ह्यातील दाराचुला आणि मुनस्युरी गावातील लोकांमध्ये हिमालयीन व्हायग्रा’ गोळा करण्यावरून संघर्ष निर्माण झाला आहे. या वनस्पतीला अत्यंत मागणी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात ही वनस्पती महागड्या किंमतीत विकली जाते. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की प्रशासनाला यात मध्यस्थी करावी लागत आहे. वाद सामंजस्याने मिटवा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लोक एकमेंकासोबत हाणामारी करत आहेत यामुळे गावात १४५ कलम लागू करण्यात आले आहे.

हिमालयीन व्हायग्रा –

व्हायग्रा हा करड्या रंगाचा किडा असतो. हा किडा हिमालयाच्या डोंगराळ भागात मिळतो. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या औषधींमध्ये त्याचा वापर करतात. हिमालयाच्या डोंगरावर आढळणारी एक बुरशी सुरवंटाच्या शरीरात प्रवेश करते. हळहळू ती सुरंवाटाला नष्ट करते. मग एका ठराविक वातावरणात सुरवंटाच्या शरीरातून ही बुरशी उगवते. एका विशिष्ट तापमानाला आणि विशिष्ट मातीतच ती उगवते.

यासाठी तापमान शून्य अंश सेल्शिअसच्या खाली असणं आवश्यक असतं. जमिनीचा जो पृष्ठभाग थंडीत गोठत नाही अशा ठिकाणी जवळपास साडेअकरा हजार फुट उंचीवर ती सुरवंटाच्या शरीरातून उगवते. गेल्या दशकभरात बिजिंगमध्ये सोन्याच्या भावापेक्षाही तिप्पट किंमत या बुरशीला मिळाली. पाण्यात उकळवून किंवा सूप व अन्य पदार्थांमध्ये टाकून ती खाल्‍ली जाते. अनेक रोगांवर ही बुरशी रामबाण उपाय असल्याचे मानले जात असल्याने तिला नेहमीच मोठी मागणी असते. तिचा बेसुमार वापर आणि हवामानातील बदल यामुळे आता या बुरशीवर अस्तित्वाचेच संकट निर्माण झाले आहे.