मनसे जिल्हाध्यक्षाला 2 वर्षे तडीपारीची नोटीस, 5 जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून दोन वर्षे हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जाधव हे विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. अलीकडेच वसई-विरार महापालिकेत त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आज ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना तडीपारीची नोटीस बजावली.
यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले, मागची अनेक वर्षे लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना ही नोटीस प्राप्त झाली. या नोटीशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात एवढे गुंड आहेत. त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

तसेच माझ्या सुरुवातीच्या सभेत मी म्हटलं होतं मला पोलीस तडीपारीची नोटीस बजावतील, आज ती नोटीस मला मिळाली. लोकांसाठी भांडयचं नाही का ? लोकांसाठी आंदोलन करताना तडीपारीची नोटीस हे महाराष्ट्र सरकारचं बक्षीस आहे, कोकणासाठी मोफत बस सोडणार म्हणून हे बक्षीस आहे, लोकांचे, पोलिसांच्या समस्या प्रखरतेने मांडले त्याच हे बक्षीस आहे. त्यामुळे यापुढे लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं नाही का हे लोकांनी ठरवावं. नोटीस आली म्हणून थांबणार नाही तर लोकांना न्याय देण्याचं काम करणारच असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.