इंदापुरात कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांची डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण, दोघांवर FIR दाखल

इंदापूरः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्सेस देवदूत बनून काम करत आहेत. मात्र असे असतानाही डॉक्टरावरील हल्ले कमी होताना दिसत नाहीत. अशातच डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण केल्याची घटना पुणे जिल्हयातील इंदापूर शहरात घडली आहे. आमच्या वडिलावर तुम्ही उपचार नीट करत नाही, असे म्हणून कोविड सेंटरमध्ये घुसून दोघा तरुणांनी एका डॉक्टरासह दोन परिचारकांना मारहाण केली आहे. इंदापूरात शनिवारी (दि. 8) ही घटना घडली. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील चंद्रकांत रणखांबे आणि रवी चंद्रकांत रणखांबे (रा. पंचायत समिती कॉलनी, इंदापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे वडिल चंद्रकांत रणखांबे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना इंदापूरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. शनिवारी आरोपीनी कोविड सेंटरमध्ये घुसून आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाही, म्हणून डॉ. श्वेता कोडग यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयातील परिचारिका अंजली पवार आणि सोम्मया बागवान या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण केली. आरोपी एवढ्याच थांबले नाहीत, तर त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर पीडित डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीत अंजली पवार जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी डॉ. श्वेता कोडग यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इंदापूर पोलीस तपास करत आहेत.