Lockdown कालावधीत लहान मुलांच्या नेत्रविकारांमध्ये 20 टक्क्यांची वाढ : नेत्रतज्ज्ञ डॉ. हेमंत तोडकर

पुणे – लॉकडाऊन कालावधीत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स (स्मार्टफोन, आय पॅड, लॅपटॉप) च्या सतत वापरामुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या अनेक समस्या वाढत असल्याचे दिसून येते. यामध्ये डोळ्यांचा कोरडेपणा, खाज सुटणे, डोळ्यांच्या कडा लाल होतात तसेच डोळ्यांमधून नैसर्गीकरित्या येणारे पाणी न येता कृत्रिम अश्रू येतात. योग्य झोप, स्क्रीन टाईम कमी करणे, पोषक आहार आदी गोष्टींनी डोळ्यांच्या समस्यांना दूर करता येणे शक्य आहे. लॉकडाऊन दरम्यान मुलांमध्ये डोळ्याच्या दुखण्यांमध्ये 20% वाढ झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान, दररोज 10 रूग्णांवर उपचार केले जात आहे. १० पैकी २ प्रकरणांमधील मुलांना लहान वयात चष्मा लागत आहे अशी माहिती पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे सल्लागार नेत्रतज्ज्ञ डॉ. हेमंत तोडकर यांनी सांगितले.

लॉकडाऊन कालावधीत सुरु असलेला डिजीटल अभ्यासक्रम असो अथवा तासनतास टिव्ही, स्मार्ट फोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर असो या सा-या कारणांमुळे घरातील लहान मुलांना डोळ्यांचे विकार उद्भवू लागले आहेत. या गॅजेट्सचा अतिवापर कसा घातक ठरू शकतो हा सांगणारा एक प्रसंग म्हणजे पुण्यातील गृहस्थ रमेशसिंग (नाव बदलले आहे) यांची मुलगी विधी (नाव बदलले आहे), जी इयत्ता चौथी इयत्ता ऑनलाईन वर्गात शिकत आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये या विद्यार्थीनीचा स्मार्ट फोनचा वापर वाढला होता. सतत दीड तास ती मोबाईलच्या संपर्कात राहिल्याने तिला हळूहळू डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या. वारंवार डोळे पुसण्यामुळे ते फुगीर आणि लालसर होऊ लागले. एवढेच नाही तर ती अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलवर गेम्सही खेळण्यासाठी देखील त्याचा वापर करू लागली. त्यानंतर तिला आणखीन डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्याने नेत्ररोग तज्ञांकडे तपासणी करता नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तिला लवकर चष्मा लागू शकतो, असे सांगून तिचा स्क्रीन टाईम कमी करण्याचा सल्ला दिला. औषधोपचाराने आता या विद्यार्थीनीच्या डोळ्यांची सूज कमी झाली असली तरी तिला वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सद्यस्थितीत मुलांनी ऑनलाईन शिक्षण घेणे आवश्यक असले तरी देखील त्यासाठी लागणा-या गॅजेट्स वापर कसा आणि किती वेळ करावा हे पालकांनी ठरवून देणे आवश्यक आहे. अतिवापरामुळे सतत डोळे चोळण्याने मुलांचे कॉर्निया पातळ होऊ शकतात आणि यामुळे त्यांची दृष्टी कायमस्वरूपी कमी होऊ शकते. शिवाय डोळे चोळण्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर विशिष्ट दबाव वाढतो ज्यामुळे दृष्टिदोष उद्भवण्याची शक्यता आहे.

डॉ. तोडकर सांगतात, खाज सुटणे, कॉर्नियाचा कोरडेपणा आणि कॉर्नियल स्ट्रक्चरमध्ये कायमस्वरूपी बदल टाळण्यासाठी या मुलांना आर्टीफिशीअल लुब्रीकंट्स किंवा कृत्रिम अश्रू दिले जातात. व्हिटॅमिन सी आणि ई, झिंक, ल्युटीन, झेक्सॅन्थेन आणि ओमेगा -3 फॅटी एसिडस्, पुरेशी झोप आणि 0-17 वयोगटातील मुलांचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर मर्याचा आणणे फायदेशीर ठरेल. स्क्रीन टाईम कमी करून मुलांना संतुलित आहार देणे हे त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.