पुण्यात २० लाखांची रोकड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने मुंकुदनगर येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरित्या जाणाऱ्या मोटारीची तपासणी केली असता तिच्या डिकीमध्ये २० लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करुन स्वारगेट पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.

महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सचिन पवार व त्यांचे सहकारी मुकुंदनगर भागात रांका हॉस्पिटल चौकात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक मोटार आली. तिची तपासणी केली असता तिच्या डिकीमध्ये २० लाख रुपये आढळून आले. ही रोकड पकडल्याचे कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ती स्वारगेट पोलीस ठाण्यात आणून जमा केली आहे. ही रोकड व मोटार राकेश रतनचंद ओसवाल (रा. चंद्रदीप, मुकुंदनगर) आहे. ते तेलाचे व्यापारी आहेत. ही रक्कम दिवसभरातील तसेच काही वार्षिक व्यवहारातील असल्याचे सांगण्यात येते. बँक बंद झाल्याने स्वत:च्या दुकानातून ती रक्कम घरी घेऊन जात होते. या पैशांबाबत योग्य त्या पुराव्यासह जिल्हा निवडणुक कार्यालयात अपिल करण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.