भितीदायक राईड : 197 फुट उंचीवर रोलरकोस्टरवर 20 लोक एक तासापर्यंत उलटे लटकत राहिले

बिजिंग : वृत्तसंस्था – चीनच्या जियांशु प्रांतात वुशीमध्ये 20 लोक एक तास हवेत उलटे लटकत होते. कारण ते रोलरकोस्टर राईडचा आनंद घेण्यासाठी गेले होते, परंतु तो उंचावर जाऊन अडकला. ही घटना आहे वुशीच्या सुनाक पार्कची. एक तासाच्या भितीदायक दृश्यानंतर सर्व लोकांना सुरक्षित रोलरकोस्टरवरून उतरवण्यात आले. सुनाक अम्यूझमेंट पार्कच्या व्यवस्थापनाने लोकांची माफी मागितली आहे. यानंतर अम्यूझमेंट पार्क बंद करण्यात आले.

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार सुनाक पार्कमध्ये ही पहिली घटना नाही. यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये सुद्धा अशी घटना घडली होती. रोलरकोस्टर लोकांनी भरलेला होता आणि तो हवेत जाऊन अडकला होता. पार्कच्या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, रोलरकोस्टरच्या समोर एखादा पक्षी उडत आला तर रोलर कोस्टरचे सेन्सर तोबडतोब त्यास थांबवतात, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये.

जेव्हा चीनच्या सरकारी अधिकार्‍यांनी आणि मीडियाने सुनाक अम्यूझमेंट पार्कच्या प्रशासनाची चौकशी केली तेव्हा त्यांनी म्हटले की, या घटनेचा तपास सुरू आहे. मागच्या घटनेचा उल्लेख करताच व्यवस्थापनाने म्हटले त्यावेळच्या दुर्घटनेचा यावेळच्या घटनेशी काहीही संबंध नाही.

या रोलरकोस्टरची लांबी 4,192 फुट आहे. सर्वात उंच भाग 196.9 फुटांचा आहे. हा रोलरकोस्टर कमाल 119 किलोमीटर प्रतितास वेगाने चालतो. सर्वात उंच ठिकाणी जाऊनच तो अडकला होता.

सुनाक पार्कच्या व्यवस्थापकांनी म्हटले की, आमच्या सर्व राईड्स काम करत आहेत. लोक त्याचा आनंद घेत आहेत. ज्या राईड्सवर सुरक्षा संबंधी मुद्दे आहेत, त्यांची तपासणी सुरू आहे. तपास संपताच आम्ही दुरूस्ती करून पुन्हा लोकांसाठी सुरू करू. परंतु, ही दुर्घटना नव्हती लोकांना सुरक्षेसाठी हवेत रोलरकोस्टर थांबला होता. कारण तो अतिशय अत्याधुनिक टेक्नोलॉजीद्वारे बनवण्यात आला आहे.